• समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

येळ्ळूर : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कचऱ्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, कचरा टाकण्याचे व वर्गीकरणाचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी समाज सारथी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २४) महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन निवेदन दिले. येळ्ळूर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिसरात शेती असल्याने शेतकरी या मार्गावरून ये-जा करतात. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, ही कुत्री अचानक दुचाकीस्वार व नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.मुख्य रस्त्यालगतच कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरात केएलई रुग्णालय असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या ठिकाणी कचरा टाकणे तातडीने बंद करून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

आयुक्त कार्तिक एम. यांनी निवेदन स्वीकारून येळ्ळूर रस्त्यालगत कचरा टाकण्याचे काम तातडीने बंद करण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित अधिकारी हणमंत कलादगी यांना समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. उपमहापौर हणमंत कोंगाली यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले.

यावेळी समाज सारथी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव बी. एन. मजुकर, गोविंद काळसेकर, शिवाजी सायनेकर, अनिल हुंदरे, डॉ. तानाजी पावले, सतीश पाटील, दत्ता उघाडे, प्रकाश पाटील, सूरज गोरल, हणमंत पाटील, गंगाधर पाटील, बाळकृष्ण पाटील, यल्लुप्पा पाटील, आनंद कुंडेकर, रमेश मोनापा धामणेकर, कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर, आदी उपस्थित होते.