येळ्ळूर : येथील के. पी. एस. मराठी मॉडेल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी.अध्यक्षा सौ.दिव्या संदिप कुंडेकर होत्या. यावेळी
भारतीय सैनिक कु. धिरज बजरंग घाडी, भारतीय सीआरपीएफच्या कु. श्रध्दा सुभाष धुळजी, स.डी.एम.सी उपाध्यक्ष श्री.जोतिबा यल्लाप्पा उडकेकर, सदस्य श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे, श्री. मारुती कृष्णा यळगुकर,सदस्या सौ.प्रियका राणोजी सांबरेकर तसेच शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी उपस्थित होते.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कु. श्रध्दा सुभाष धुळजी यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे, तर कु. धीरज बजरंग घाडी यांच्याहस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी ‘जय जवान, जय किसान’ या लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या विचारांचा संदर्भ देत शाळेतील माजी विद्यार्थी आणि भारतीय सैनिक कु. धिरज बजरंग घाडी तसेच भारतीय सी.आर.पी.एफ पोलीस कु. श्रध्दा सुभाष धुळजी यांचा शाळेच्या वतीने शाल, पुष्पहार व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रभावी भाषणे केली. तसेच संगीत सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

सन २०२६ -२७ च्या पहिल्या सत्रातील शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस.डी.एम.सी.सदस्य श्री चांगदेव शिवाजी मुरकुटे यांच्याहस्ते वह्या देऊन गौरव करण्यात आला. तसेच जयंती निमित्त भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.डी.एम.सी. सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर यांनी आपल्या आजी कै.गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ वह्या देऊन प्रोत्साहन दिले.

श्रध्दा सुभाष धुळजी यांनी आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. कु. धिरज बजरंग घाडी यांनी आपल्या विचारांतून विद्यार्थी घडविताना आवश्यक असलेल्या कला गुणांवर मार्गदर्शन केले. एस.डी.एम.सी.उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी महात्मा गांधी – लालबहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात सौ.दिव्या संदीप कुंडेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत बक्षीसे देणाऱ्या एस. डी. एम.सी. सदस्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक शाळेच्या सहशिक्षिका सौ. मेघा देसाई यांनी केले. स्वागत शाळेच्या सहशिक्षिका सौ.ऐश्वर्या मेणसे यांनी केले, तर मान्यवरांचे आभार शिक्षक श्री. सातेरी पाखरे यांनी मानले. कार्यक्रमास एस.डी.एम.सी.अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य, वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.