• शिवानंद महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विशेष व्याख्यान

कागवाड : कोणत्याही दबावामुळे भाषेचे अस्तित्व नष्ट होत नाही. सामान्य माणूस जेव्हा एखाद्या भाषेपासून फारकत घेतो, तेव्हाच त्या भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून माणसांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हिंदी भाषेने भारतातील विविध प्रांतांतील लोकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे प्रतिपादन प्रा संतोष सुर्यवंशी यांनी केले केले.

येथील एसएमएटीच्या शिवानंद महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी दिवसानिमित्त आयोजित ‘हिंदी भाषा एवं साहित्य’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार होते. व्यासपीठावर आयक्यूएसी समन्वयक प्रा. बी. डी. दामन्नावर, हिंदी विभागप्रमुख डॉ. अमोल पाटील आणि प्रा. आय. एस. जमादार उपस्थित होते.

प्रा. संतोष सुर्यवंशी यांनी हिंदी भाषेच्या विकासाचा आढावा घेताना संत तुलसीदास यांच्या रामचरितमानस या ग्रंथाचे हिंदी भाषेच्या प्रसारातील योगदान अधोरेखित केले. हिंदी साहित्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीमुळेही या भाषेचा देशभर मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत हिंदी भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच विविध भाषा आणि संस्कृती असलेल्या भारताला परस्परांशी जोडण्यात हिंदीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी कु. अनन्या कुलकर्णी हिच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. आय. एस. जमादार यांनी स्वागत केले, तर डॉ. अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी प्रा. बी. डी. दामन्नावर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी भारताच्या बहुभाषिक स्वरूपाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतानाच इतर भाषांचाही आदर आणि गौरव केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी भाषण व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ओंकार कांबळे यांनी केले, तर सानिया गायकवाड हिने आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि हिंदी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.