• ‘बेळगाव महानगर काँग्रेस ट्रॉफी-२०२६’ प्रभागस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सरदार हायस्कूल मैदानाची मागणी

बेळगाव : शहरातील क्रीडा वातावरणाला चालना देण्यासाठी बेळगाव महानगर काँग्रेस समिती आणि सतीश जारकीहोळी क्रिकेट फेडरेशनच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात प्रभागस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘बेळगाव महानगर काँग्रेस ट्रॉफी-२०२६’ या नावाने ही स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सरदार हायस्कूलचे मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ आणि नगर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजसलीम काशिमान्नवर यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन चर्चा केली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी सरदार हायस्कूलच्या मैदानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत विनंतीपत्रही सादर करण्यात आले. प्रभागस्तरावर स्पर्धा आयोजित केल्यामुळे शहरातील विविध भागांतील क्रिकेटपटूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, या भेटीदरम्यान एसआयआरमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.