बेळगाव : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स (IFRM) च्या बेळगाव अध्याय ‘सप्तस्वर’ चा चार्टर स्थापना सोहळा बेळगाव येथील हॉटेल मनोरथ लॉर्ड्स इको इन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या सोहळ्यास IFRM झोन 5, 7 आणि 8 चे मुख्य समन्वयक रोटे. नरसिंह कन्नन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच IFRM झोन 7 चे प्रादेशिक समन्वयक रोटे. रवी चक्रवर्ती आणि डीजीई रोटे. अशोक नाईक यांची सन्मानीय उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांनी ‘सप्तस्वर’च्या या ऐतिहासिक चार्टर स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी ‘सप्तस्वर’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत क्लबच्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. संगीतासारख्या माध्यमातून मैत्री, बंधुभाव आणि रोटरी फेलोशिप अधिक आनंददायी पद्धतीने साजरी करता येते, असे मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमाला IFRM चे वरिष्ठ पदाधिकारी, रोटेरियन तसेच संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेल संगीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘सप्तस्वर’च्या यशस्वी चार्टर स्थापनेमुळे बेळगावातील रोटरी फेलोशिपला एक नवे आणि अर्थपूर्ण परिमाण प्राप्त झाले असून, संगीताच्या माध्यमातून मैत्री, सर्जनशीलता आणि एकोप्याची ही सुरेल वाटचाल आता सुरू झाली आहे.