- दुभाजकावर कार आदळली ; एक जण गंभीर जखमी
विजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर विजापूर जिल्ह्यातील मनगुळीजवळ झालेल्या भीषण कार अपघातात आईसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात सत्यवेणी (३८), हरीव्यंकटराम (२०) आणि जशवंत (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राघवेंद्र (४१) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारटगी येथील हे कुटुंब कार (क्र. KA-33 N-4689) घेऊन शिर्डी यात्रेसाठी रवाना झाले होते. प्राथमिक तपासात प्रवासाच्या तयारीमुळे कुटुंब रात्रभर जागे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चालकाला झोपेची डुलकी लागल्याने आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच मनगुळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मनगुळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.








