विजयपूर / दिपक शिंत्रे

वचन आणि बसव तत्वज्ञानाचे जगातील प्रमुख पाच-सहा भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल असे उद्योग व पायाभूत सुविधा विकास मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी जाहीर केले. शहरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात पार पडलेल्या “My Me is Thee (माझ्यातील मी म्हणजे तूच)” या इंग्रजीत भाषांतरित बसव वचनांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना सांगितले. हे पुस्तक डीवायएसपी बसवराज यलिगार यांनी अनुवादित केले आहे. मंत्री म्हणाले की, बसवशरणांनी जगातली पहिली संसदेची संकल्पना मांडली होती आणि समाजात सर्व कामगार वर्गांना प्रतिनिधित्व देऊन एक समतेचे आणि सुंदर समाजाचे स्वप्न पाहिले होते. लिंगायत हे जातिव्यवस्थेतील एक पंथ नसून जातिरहित धर्म आहे. तर आज संपूर्ण देश बसवधर्माचा अनुयायी असता, असेही त्यांनी सांगितले.

  • बसवराज यलिगार यांचे कौतुक :

पोलिस खात्यातील नेहमीच दबावाखाली व व्यस्त नोकरी करतानाही बसवराज यलिगार यांनी महात्मा बसव वचनांचे इंग्रजीत भाषांतर केल्याचे ते कोतुकास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले आणि हे पुस्तक महात्मा बसव जन्मभूमीत, शरणांच्या उपस्थितीत प्रकाशित झाल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक वाढल्याचंही त्यांनी नमूद केले. अशा बसवमूल्यांवर आधारलेले विचार मांडणाऱ्यांना नेहमीच पाठिंबा दिला जाईल असे ही त्यांनी सांगितले.

शरण परंपरेचा गौरव वचने ही आपली संस्कृती आणि संपत्ती असल्याचे सांगून, प्राचीन काळी अनेकांनी तन- मन – धन अर्पण करून वचने संकलित केली आणि त्यामुळे आज आपल्याला सुमारे २०० श्री बसवशरणांची माहिती मिळाली आहे. इतिहासातून बसव विचार नष्ट करण्यासाठी अजूनही काहीजण खोट्या वचनांची भर घालण्याचे काम करत आहेत, पण आपण कोणाच्याही विरोधात नसून आपली परंपरा जपायची आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सिद्धराम बेलदाळ यांचे विचार बिदर जिल्ह्यातील बसव कल्याणच्या बसव महामने संस्थेचे डॉ. सिद्धराम बेलदाळ म्हणाले की, श्री बसव कोणत्याही एका समुदायाचा नाही. त्यांचे खरे तत्वज्ञान अद्यापही अनेक मठांपर्यंत पोहोचलेले नाही. लिंगायत धर्म म्हणजे माणसांमध्ये समता आणि स्वतःचे तत्वज्ञान ओळखून देवत्व प्राप्त करणं. यलिगार यांच्या ग्रंथात हे स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.

तबलिक जमातचे प्रमुख मौलाना अबूबकर यांनी सांगितले की, बाल्यापासून वचने ऐकत आलो आहोत. बसवांनी जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपलं आयुष्य वाहिलं. आमच्यात प्रतिभा आहे, पण प्रोत्साहनाची कमतरता आहे. आम्ही वचने हिंदी आणि उर्दूतही भाषांतरित करणार आहोत आणि बुद्ध, बसव, आंबेडकर, इस्लाम या धर्मांमधील समानतेचा अभ्यास करून ग्रंथ प्रकाशित करू. ज्येष्ठ साहित्यिक देवनूर शंकर म्हणाले की, वचने म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. जीवन हे शोभेचे न बनता प्रेरणादायी असावे, असा संदेश वचने देतात. आपल्या शरणांनी समतेसाठी सामाजिक क्रांती केली होती.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार अरुण शाहापुर म्हणाले की, वचने फक्त विचारवंतांसाठी न राहता सर्वांपर्यंत पोहोचायला हवीत. वचने नैतिक शिक्षणाचा सार असून, ती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करावी.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्राध्यापक गिल बेन हेरुथ म्हणाले की, बसव वचनांनी प्रभावित झालो आहे. मी माझ्या वर्गात विद्यार्थ्यांना या साहित्याबद्दल शिकवतो. यलिगार यांचे पुस्तक भारतच नव्हे, तर जगासाठी मौल्यवान आहे. बसवराज यलिगार यांनी भाषांतर करताना मदत करणाऱ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिल्पा यांना दिवंगत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे ४० खंडांचे साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.

विजयपूरचे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, अपर जिल्हाधिकारी सोमलिंग गेनूर, लेखक राजशेखर मठपती (रागं), शिक्षक अशोक हंचली, वकील महमदगौस हवालदार, माजी आमदार प्रा. राजूलगूर, अब्दुल हमीद मुश्रिफ, पोलिस अधिकारी शंकर मारिहाळ, रामणगौड हट्टी, एएसआय रमेश मूळीमणी आदी उपस्थित होते. डॉ. महांतेश बिरादार यांनी स्वागत केले तर दीक्षा आणि दिव्या भिसे यांनी भरतनाट्यम सादर केले. साक्षी हिरेमठ यांनी वचन गायन तर सानिया जिद्दी यांनी सूत्रसंचालन केले. शरणू सबरद यांनी आभार मानले.