• प्रतिटन ३,६०० रुपये दर मान्य ; उद्या पासून कारखाने सुरू होणार
  • १,००० रुपयांच्या अनुदानासाठी पुन्हा संघर्षाचा इशारा

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीवर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तात्पुरते यश मिळाले आहे. साखर कारखानदारांनी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची तयारी दर्शविल्यानंतर शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे उद्यापासून साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलीस कोठडीतून सुटका झाल्यानंतर पोलीस क्वार्टर्समधील वीरभद्र मंदिरात आयोजित बैठकीत पुजारी यांनी आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. कारखानदारांनी दराबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी कारखाने सुरू करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी संघटनांकडून प्रतिटन ३,८०० रुपये दराची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत कारखानदारांनी ३,६०० रुपये देण्यास मान्यता दिली. याशिवाय साखरेच्या विक्रीदरात प्रत्येक ५० रुपयांची वाढ झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाही देण्याचे मान्य करण्यात आले आहे. साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा देण्याचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रतिटन १,००० रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या अनुदानाबाबत स्पष्ट घोषणा करावी, अशी मागणी पुजारी यांनी केली. अन्यथा बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गुरलापूर येथील शेतकरी आंदोलनही तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाची पुढील दिशा आणि प्रोत्साहन अनुदानाच्या मागणीसंदर्भातील रणनीती निश्चित करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदारांशी झालेल्या सहमतीमुळे सध्या आंदोलनाला विराम मिळाला असला, तरी सरकारी प्रोत्साहन अनुदानाचा मुद्दा कायम आहे. त्यामुळे या मागणीवर सरकार काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.