बेळगाव : शहरातील उद्यमबाग औद्योगिक परिसरात कचरा संकलनाच्या कामादरम्यान ५९ जिवंत काडतुसे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काडतुसे ताब्यात घेतली असून त्याबाबत सखोल तपास सुरू केला आहे.
महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेहमीप्रमाणे उद्यमबाग परिसरातील रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा साफ करत होते. त्यावेळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद वस्तू दिसून आल्याने त्यांनी त्याची पाहणी केली असता तेथे जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ उद्यमबाग पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली आणि काडतुसे जप्त केली. प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या ५९ काडतुसांपैकी ४१ काडतुसे एका प्रकारची, तर उर्वरित १८ काडतुसे दुसऱ्या प्रकारची असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून, ही काडतुसे नेमकी कुठून आली, ती येथे कोणी टाकली आणि त्यामागे कोणता हेतू होता का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे सापडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








