बेळगाव : राज्यभरात चर्चेत असलेल्या ‘शिवम असोसिएट्स’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला असून, त्याची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या विविध अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी १५ मे रोजी शिवानंद नीलण्णावर याला आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणाची सुनावणी बेंगळुरू येथील सिटी सिव्हिल आणि सत्र न्यायालयात झाली.
न्यायालयाने १२ जून रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करत काही कठोर अटी घातल्या आहेत. त्यानुसार, नीलण्णावर याने तीन लाख रुपयांचे हमीपत्र सादर करणे, देशाबाहेर न जाणे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
जामीन मंजूर झाल्यानंतर शिवानंद नीलण्णावरची काल रात्री हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती न देता केवळ “ओम नमः शिवाय” असा उल्लेख करून तेथून प्रस्थान केले.
दरम्यान, या प्रकरणातील तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांचे दावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.








