- २४ जून रोजी ‘फ्युचर ऑफ बेळगाव@२०४७’ विषयावर विशेष महाचर्चा
बेळगाव : शहरात ‘सेकंड व्हिजन कर्नाटक २०२६’ या तीन दिवसीय सार्वजनिक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रांतील तांत्रिक प्रगती आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नेहरूनगर येथील केएलई कन्व्हेन्शन सेंटरमधील डॉ. बी. एस. जिरगे ऑडिटोरियम येथे हे प्रदर्शन २५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
दिल्लीस्थित ‘प्रयास’ एक्झिबिशन्सच्या वतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रयास’चे प्रमुख वनीश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिजन कर्नाटक २०२५’ प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाही हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नागरिकांना भेट देता येणार आहे.
खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शासकीय योजना, तंत्रज्ञान आणि विकासाच्या विविध संकल्पनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
प्रदर्शनात संरक्षण, कृषी, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, तसेच ग्रामीण विकास या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक नामांकित राष्ट्रीय कंपन्या आणि बँका या उपक्रमात प्रायोजक म्हणून सहभागी झाल्या आहेत.
या प्रदर्शनात इस्रो, आयसीएमआर, संरक्षण मंत्रालय, नैऋत्य रेल्वे, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह विविध प्रतिष्ठित संस्था आपली तांत्रिक प्रगती, संशोधन आणि जनहिताच्या योजनांची माहिती नागरिकांसमोर मांडणार आहेत.
दरम्यान, २४ जून रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत ‘फ्युचर ऑफ बेळगाव@२०४७’ या विषयावर विशेष महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असा बेळगावच्या भविष्यातील विकासाचा आराखडा या चर्चेत मांडला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.








