- लेखक – पत्रकारांनी भूमिका घेणे आवश्यक – राजीमवाले
बेळगाव : देशातील सद्यस्थिती चिंता करावी अशी आहे. याबाबत जनजागृतीची गरज आहे. यासाठी लेखक पत्रकार व विचारवंतांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत अनिल राजीमवाले (नवी दिल्ली) यांनी केले.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने आणि प्रगतिशील लेखक संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जागर विवेकाचा कार्यक्रमांतर्गत व्याख्यानात राजीमवाले बोलत होते. आजची परिस्थिती आणि लेखकांची जबाबदारी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रगतिशीलचे अध्यक्ष प्रा आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.
मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण समन्वयक नीला आपटे यांच्या मंदिर मस्जिद. हिंदू कहता मंदिर मेरा धाम मुस्लिम कहता है मक्का अल्लाका इन्सान या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अध्यक्ष मेणसे यांच्या हस्ते व्याख्याते राजीमवाले यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर बोलताना राजीमवाले म्हणाले, स्वातंत्र्य लढ्याबाबत जनजागृती करण्यासाठी पी. सी. जोशी यांनी लेखक व कलावंतांना एकत्र केले. त्यातूनच १९३६ सारी प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली. त्यानंतर इप्टा स्थापन झाले आणि त्या माध्यमातून लेखक कलावंतानी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांनी जनजागृती करुन जनसमूहाला विशेषतः श्रमजीवी वर्गाला लढ्यात उतरविले. आज लेखक कलावंतांनी तशीच भूमिका घेणे आवश्यक आहे. आज वाचन कमी झाले आहे अशी तक्रार केली जाते. पण आजचा तरुण जुनं साहित्य वाचत नाही. मात्र तो नवं साहित्य जरुर वाचतो, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आनंद मेणसे यांनी आज सरकारच्या विरोधात असंतोष आहे. पण प्रसार माध्यमे, लेखक कवी दबावाखाली आहेत असे सांगून १९९० नंतरच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. अयोध्यात राममंदिर उभारणे हा राजकारणाचा मुद्दा बनविला गेला आणि सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडले. याच राम मंदिरात कोट्यवधी रुपयांची चोरी झाली. पण त्याबाबत साधा एफआयआरही दाखल झाला नाही. प्रसार माध्यमांत त्याची बातमीही आली नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह जोतिबा अगसीमनी यांनी आभार मानले. प्रगतिशीलचे उपाध्यक्ष अनिल आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश कॉंप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.







