बेळगाव : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर प्रशासन, शेतकरी, ग्रामस्थ आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. आज सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी तसेच पत्रकार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकरी ईश्वर बोबाटे यांच्यासह संबंधित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांना रस्त्याची गरज असतानाच काही शेतकऱ्यांच्या अडचणी व हरकतीही होत्या. त्यामुळे रस्ता व्हावा आणि शेतकऱ्यांचे नुकसानही होऊ नये, अशी भूमिका खानापूर ब्लॉक काँग्रेसने घेतली होती. यापूर्वी तहसीलदार व सर्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. तहसीलदारांनी सर्व संबंधितांना नोटिसा बजावून आज संयुक्त पाहणी आयोजित केली. यावेळी सर्व घटकांशी चर्चा करून सामंजस्याने निर्णय घेण्यात आला.

भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधितांकडून बाँड पेपरवर सह्याही घेण्यात आल्या. शेतकरी ईश्वर बोबाटे यांनी रस्त्याला विरोध नसून रस्ता शेताच्या मधोमध न नेता एका बाजूने न्यावा, तसेच सीडी (क्रॉस ड्रेनेज) संदर्भातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत कार्यकारी अधिकारी (ईओ) व पीडीओ यांच्याशी चर्चा केली. पुढील वर्षात नवीन सीडी तसेच गावाकडील उर्वरित रस्ता मंजूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. शेतकऱ्यांनीही आपले नुकसान होणार नाही अशा पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अमृत शेलार, ईश्वर बोबाटे, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भुजंग पाटील, विठ्ठल उर्फ बाळू पाटील, सुरेश जाधव, नगरसेवक तोहीद चांदकन्नावर, साईश सुतार, भूषण पाटील, अभिषेक शहापूरकर, यशवंत देसाई (कारलगा), पत्रकार वासुदेव चौगुले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर सामंजस्याने मार्ग निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.