- दोघांना अटक ; ९ लाख रुपयांचा तांदूळ आणि ट्रक जप्त
निपाणी : शिधापत्रिकाधारकांना शासनामार्फत वितरित करण्यात येणारा तांदूळ कमी दरात खरेदी करून तो खुल्या बाजारात अधिक किमतीत विक्री करणाऱ्या तस्करीच्या जाळ्यावर अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा आघात केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर तांदूळ आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.
रेशन तांदळाच्या अवैध साठा आणि विक्रीबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निपाणी येथील हिदायतनगर परिसर तसेच शिरगुप्पी-पांगिरा मार्गावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान हिदायतनगरमधील गांधी चौक परिसरात राहणारे सोहेल आलम दलायत (वय ३५) यांच्या गोदामातून रेशन तांदळाच्या ५० पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच शिरगुप्पी-पांगिरा रस्त्यावर संशयित ट्रकची तपासणी केली असता संदीप बाळासाहेब गंगाले यांच्या ताब्यातील वाहनातून तांदळाच्या आणखी १०४ पिशव्या आढळून आल्या.
अधिकाऱ्यांनी तस्करीसाठी वापरण्यात आलेला ट्रक, १५४ पिशव्या तांदूळ आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेशन तांदळाच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मोहिमेत अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्यासह कर्मचारी आकाश घुग्रे, निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार आणि शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक संजीवनी नरसपन्नवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.








