• कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाचा निर्णय

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने २२ जून रोजी आयोजित केलेल्या महामोर्चाला शहर पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना अधिकृत पत्राद्वारे निर्णयाची माहिती दिली आहे.

समितीच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, शहरातील विद्यमान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि विविध भाषिक समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन मोर्चाला परवानगी देणे उचित नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोर्चासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याबरोबरच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने कर्नाटक पोलीस अधिनियम तसेच राज्यघटनेतील संबंधित तरतुदींचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, समितीच्या प्रतिनिधी मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.