• कर्नाटकातील तिघांना अटक

चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही धागेदोऱ्यांच्या आधारे उलगडा करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. महिलेची ओळख नसताना आणि अत्यल्प पुरावे उपलब्ध असतानाही पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे या खळबळजनक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

दि. 29 मे 2026 रोजी सकाळी तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंदगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासाची जबाबदारी सोपवली. तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि अन्य पुराव्यांच्या आधारे महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. याचबरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. तिलारीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचेही बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

तपासादरम्यान मृत महिलेची ओळख गंगवा सत्याप्पा हंचीमनी (वय 25, रा. वंटमोरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी दि. 25 मे रोजी तिलारी घाटातून गेलेल्या एका इको कारचा माग काढला. तब्बल 110 किलोमीटर परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

या तपासातून बसवराज चेल्लप्पा करणावर (वय 33, रा. राजकोटे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चेल्लप्पा चेल्लप्पा करणावर (वय 57, रा. राजकोटे) आणि लक्ष्मण लक्ष्मण अंकली (वय 37, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी) यांच्या मदतीने गंगवा हंचीमनी हिचा खून करून मृतदेह तिलारी घाट परिसरात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, चंदगड पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, विजय इंगळे, समीर कांबळे, सागर चौगुले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.