बेळगाव : सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार फेरनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मराठी भाषिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. ही बैठक रविवार, ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे होणार आहे.

सीमाभागात राबविण्यात येत असलेल्या एसआयआर प्रक्रियेचे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध करून दिले जात असल्याने, ही प्रक्रिया मराठी भाषेतही राबविण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधी आणि माजी नगरसेवकांनी शुक्रवारी बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी असलेल्या महापालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेतली होती.

यावेळी समितीने राष्ट्रीय पक्षांप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीलाही एसआयआर प्रक्रियेची माहिती देण्यात यावी, तसेच समितीच्या प्रभागनिहाय प्रतिनिधींना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (बीएलए/पोलिंग एजंट) यांची यादी प्रशासनाकडे सादर केल्यास संबंधित प्रतिनिधींना प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिल्याचे समितीने सांगितले.

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील समितीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (पोलिंग एजंट) म्हणून कार्य करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील प्रतिनिधींची यादी सोबत आणावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, एम. जी. पाटील आणि अमर येळ्ळूरकर यांनी केले आहे.