• सोयीप्रमाणे मुदत देण्याच्या सूचना
  • परदेशात राहणारे मतदार, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि सैनिकांच्या अडचणींची दखल
  • लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे

बेळगाव : निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत नागरिकांना होणाऱ्या अडचणींची प्रशासनाने दखल घेतली आहे. विशेषतः परदेशात तसेच मुंबई, पुणे आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी नोटीस प्रक्रियेत आवश्यक सवलत देण्याबाबत लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्ह्यात एकूण ८४ हजार नोटिसा बजावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ६० हजार नोटिसांचे वितरण करण्यात आले आहे.

नोटीस मिळालेल्या व्यक्तीला किमान सात दिवसांची मुदत देणे अनिवार्य आहे. मात्र, बाहेरील शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेळगावला येताना अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित बीएलओंना त्यांच्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गर्भवती महिला, स्तनदा माता, सैनिक तसेच व्हिसासंदर्भातील अडचणींमुळे अमेरिका, लंडन यांसह परदेशात वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या वैयक्तिक अडचणींची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

जनतेला SIR प्रक्रियेत कोणतीही अनावश्यक गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सवलती आणि प्रक्रियेचे सुलभीकरण करणारे नवीन आदेश लवकरच जारी करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.