• मराठी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी
  • मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेळगावात तातडीने जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करावी आणि मराठी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. गेल्या चार महिन्यांपासून या मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने १७ सप्टेंबरनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासह मतदार याद्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांसंदर्भात वारंवार विनंती करूनही चार महिन्यांत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दल नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत लवकरात लवकर भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले. मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी तसेच नावांचा समावेश करण्यासाठी नागरिकांनी १७ सप्टेंबरनंतर ग्रामपंचायतींकडे मराठी भाषेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. १७ सप्टेंबरनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या विनंतीवरून तो रद्द करण्यात आला. त्यावेळी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठी भाषिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भाषिक अल्पसंख्याक समितीची स्थापना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर म. ए. समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह समितीचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.