- भर उन्हात महापालिकेसमोर हलगी वाजवत अधिकाऱ्यांचा निषेध
बेळगाव : गोरगरिबांना दिलासा देणाऱ्या सिंगल टॅक्स आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सरकार नियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी महापालिकेसमोर भर उन्हात हलगी वाजवत अनोखे आंदोलन केले. महापालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला.
महापालिका बैठकीपूर्वीच हे आंदोलन छेडण्यात आले. घोषणाबाजी करत नाशिपुडी यांनी अधिकाऱ्यांवर सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. बांधकाम परवानगीशिवाय घरे बांधलेल्या गरिबांकडून एकदाच दुहेरी कर वसूल करून त्यानंतर दरवर्षी एकच कर आकारण्याचा आदेश असतानाही, प्रत्यक्षात दरवर्षी दुहेरी कर आकारला जात असल्याने गोरगरिबांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही महापालिका व आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून सिंगल टॅक्स धोरण तातडीने लागू करावे, अशी त्यांची ठाम मागणी होती.
दरम्यान, आमदार आसिफ सेठ यांच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या चर्चेत हा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नाशिपुडी यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले.








