• ‘तो एक राजहंस’सह तीन नाटकांचे बेंगळुरूत लोकार्पण

बेळगाव : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य कन्नड भाषेत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान ‘बहुवचन’ संस्थेने हाती घेतले असून, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत ज्येष्ठ नाट्यकार हुलगप्पा कट्टीमनी यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे कन्नड वाचकांना इतर भाषांतील दर्जेदार साहित्य वाचण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावचे पत्रकार व अनुवादक अशोक चिक्कपरप्पा यांनी मराठीतून कन्नडमध्ये अनुवादित केलेल्या ‘तो एक राजहंस’सह ‘नेरळुगळू’ (सावळ्या) आणि ‘अतंत्र’ (अधांतर) या तीन नाटकांचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. १२) बेंगळुरू येथील सुचित्रा सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारवाड रंगायणचे माजी संचालक हुलगप्पा कट्टीमनी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बहुवचनच्या दीपा गणेश यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर डी.एस. चौगुले, विवेक शानभाग, डॉ. हेमा पट्टणशेट्टी, अशोक चिक्कपरप्पा आणि विशाल महाले यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ लेखिका व अनुवादक डॉ. हेमा पट्टणशेट्टी यांनी या तिन्ही नाटकांच्या आशयगर्भतेचे आणि अनुवादातील सौंदर्याचे सविस्तर विश्लेषण केले. तर डी.एस. चौगुले यांनी भाषांतर प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि आवश्यक शिस्त याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची विशेष रंगत ‘राजहंस’ नाटकाच्या वाचनाने वाढली. ज्येष्ठ कलाकार कीर्ती भानू आणि प्राची रविचंद्र यांनी सादर केलेल्या प्रभावी वाचनाने प्रेक्षकांची दाद मिळवली. ‘अतंत्र’चे अनुवादक विशाल महाले यांनी मेलुकोटे येथील फेलोशिपच्या आठवणींना उजाळा दिला.

अनुवादक अशोक चिक्कपरप्पा यांनी मनोगतात फेलोशिपसाठी लागणाऱ्या संदर्भ साहित्याबाबत सुरुवातीला आलेल्या अडचणींचा उल्लेख केला. यावेळी बेळगावचे वसंत धामणेकर आणि नवसाहित्य बुक स्टॉलच्या जवळकर बंधूंनी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आईच्या हस्ते पहिली प्रत; भावूक क्षण कार्यक्रमातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे अशोक चिक्कपरप्पा यांनी पुस्तकाची पहिली प्रत आपल्या ८७ वर्षीय मातोश्री तंगेव्वा गुंडप्पा चिक्कपरप्पा यांच्या हस्ते स्वीकारली. पारंपरिक पद्धतीला छेद देत आईकडून पुस्तक स्वीकारण्याच्या या कृतीने संपूर्ण सभागृह भावूक झाले. ‘जागतिक मातृदिना’पूर्वीच आईला दिलेला हा मान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. सूत्रसंचालन सुमधुरा यांनी केले, तर कथाकार विवेक शानभाग यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला कन्नड साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.