नवी दिल्ली : केएलईचे मानद अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईचे संचालक श्री. विजय मेटगुड यांच्यासमवेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत कर्नाटकातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत सौंदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्ग ७४८ए वर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच बेळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८बी च्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.

एनएच-७४८ए संदर्भात नवीन महामार्गाच्या संरेखनामुळे पारंपरिक बैलगाडी मार्गांना आणि कृषी वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी सौंदत्ती तालुक्यातील मुरकुंबी आणि हिरेकोप्प गावांजवळ नवीन वाहन भुयारी मार्ग (व्हीयूपी) उभारण्याची विनंती डॉ. कोरे यांनी केली.

तसेच अथणी तालुक्यातील मुरगुंडी ते हुक्केरी तालुक्यातील गोतुर दरम्यान असलेल्या एनएच-५४८बी रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी मंत्र्यांना केले.

हा रस्ता प्रादेशिक आर्थिक विकासासाठी तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.