- काँग्रेसच्या भूमिकेला तीव्र विरोध
बेळगाव : केंद्र सरकारच्या महिला आरक्षण आणि नारी शक्ती धोरणाला काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला सक्षमीकरण कायदा मंजूर करण्यात आला. महापौर प्रीती कामकर यांच्या पुढाकाराने हा ठराव सभागृहात मंजूर झाला असून या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
शनिवारी झालेल्या सभेत केंद्र सरकारच्या महिलांसाठीच्या ३३ टक्के आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून विरोध झाल्याबद्दल सत्ताधारी गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या विरोधाचा निषेध करत महापालिकेत महिला सक्षमीकरण कायदा मंजूर करण्यात आला.
उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना सांगितले की, केंद्र सरकारच्या नारी शक्ती योजनेला विरोध करणारे धोरण देशातील जनता कधीही स्वीकारणार नाही. चर्चेच्या भीतीने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप सदस्य राजशेखर डोणी यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, महिला सक्षमीकरणाच्या विरोधातील भूमिका ही स्त्रीशक्तीचा अपमान करणारी आहे. अशा भूमिकांचा महापालिकेत ठाम निषेध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून पुढील काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








