बेळगाव : शहरात दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला यंदाही भव्य स्वरूप लाभणार असून, सार्वजनिक शिवजयंतीची परंपरा शंभरी पार करून आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शहर व परिसरातील अनेक मंडळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करतात. विशेष म्हणजे या उपक्रमात महिला आणि बालचमूंचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो.
याच पार्श्वभूमीवर मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. रवी पाटील पुरस्कृत श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे “सजीव देखावा स्पर्धा २०२६” जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेतील चित्ररथांचे परीक्षण पारंपरिक मिरवणूक मार्गावर फिरत्या स्वरूपात केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी ३१,००० रुपये, द्वितीय २५,०००, तृतीय २१,०००, चतुर्थ १५,०००, पाचवा १३,०००, सहावा ११,०००, सातवा ९,०००, आठवा ८,०००, नववा ७,००० आणि दहावा क्रमांकासाठी ५,००० रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराज अभिनय, उत्कृष्ट राजमाता जिजाऊ साहेब अभिनय, आकर्षक महिला व पुरुष अभिनय तसेच उत्कृष्ट बालकलाकार अशा विशेष पारितोषिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख १८ एप्रिल ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी ग्रीन्स द युनिक पान शॉप, केळकर बाग, दत्त मंदिरासमोर, बेळगाव येथे नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी सुनील जाधव (९९६४३७०२६१), मेघन तारीहाळकर (७३५३२५३५७३) आणि प्रसाद पाटील (८०५०००९६६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यंदाची शिवजयंती अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.








