बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २१ एप्रिलपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले असून त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.
मिरवणूक राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, कॉलेज रोड, पिंपळकट्टा आदी मार्गांवरून पुढे जात नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिरमार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ कपिलेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे.
दरम्यान, किल्ला तलाव, अशोक स्तंभ सर्कल, आरटीओ सर्कलहून राणी चन्नम्मा सर्कलकडे जाणारी वाहतूक संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून एसपी ऑफिसमार्गे कोल्हापूर सर्कल, सदाशिवनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूर रोडकडे वळविण्यात आली आहे.
खानापूरहून काँग्रेस रोडमार्गे शहरात येणारी तसेच रेल्वे उड्डाणपुलावरून येणारी वाहने ग्लोब थिएटर सर्कलमार्गे गवळी गल्ली क्रॉस, शरकत पार्क, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोडवरून बॉक्साईट रोडकडे वळविण्यात येणार आहेत. गोगटे सर्कलहून स्टेशन रोड, हेडपोस्ट ऑफिस, शनिमंदिरकडे जाणारी वाहतूक गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्लीमार्गे वळविण्यात येणार आहे.
नाथ पै सर्कलहून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक खासबाग बसवेश्वर सर्कल व संभाजी गल्लीमार्गे वळविली जाणार आहे. तसेच जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौकमार्गे जाणारी वाहतूक थेट मध्यवर्ती बसस्थानक किंवा जुन्या पी. बी. रोडकडे वळविण्यात येणार आहे.
जुना पी. बी. रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोडमार्गे कपिलेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक डाव्या बाजूने वळवून व्हीआरएल लॉजिस्टिकमार्गे पुन्हा जुन्या पी. बी. रोडवर नेण्यात येणार आहे. गुड्सशेड रोडमार्गे येणारी वाहतूक मराठा मंदिर व गोवावेस सर्कलकडे वळविण्यात येणार आहे.
मिरवणूक मार्गावर जिथे डबल रोड आहे, तेथे एक बाजू पूर्णपणे मिरवणुकीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हे बदल मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून बुधवारी मिरवणूक संपेपर्यंत लागू राहणार आहेत.
- वाहने उभी करण्यास प्रतिबंध :
वाहन पार्किंगवरही निर्बंध घालण्यात आले असून राणी चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेस, गणपत गल्ली, कपिलेश्वर मंदिर परिसर, हॅवलॉक रोड, कॅटल रोड, यंदे खूट सिग्नल ते कॉलेज रोडपर्यंत मिरवणूक संपेपर्यंत वाहन उभे करण्यास बंदी असेल. पार्किंगसाठी महिला पोलीस ठाण्याच्या पाठीमागील जागा तसेच संभाजी उद्यान परिसर येथे व्यवस्था करण्यात आली आहे.








