• २६ एप्रिलच्या जंगी मैदानासाठी तयारी सुरू

सांबरा : सांबरा कुस्ती कमिटीच्या वतीने गतवर्षी यशस्वीरीत्या पार पडलेल्या कुस्ती आखाड्याचा जमा-खर्च अहवाल हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आला. या प्रसंगी अहवालाचे वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ इराप्पा जोई, शिवाजी जत्राटी, नागो यड्डी, सिद्राई यड्डी आणि लक्ष्मण यड्डी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षीच्या आखाड्याचा आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने मांडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रविवार दि. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती मैदानाच्या आयोजनासाठी तयारीला वेग देण्यात आला असून, हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आखाडा उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच नवीन तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या आखाड्याबाबत यल्लाप्पा हरजी यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास लक्ष्मण सुळेभावी, मोहन हरजी, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, भुजंग धर्मोजी, भुजंग गिरमल, शिवानंद पाटील, कृष्णा जोई, शीतल तिप्पाण्णाचे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जोई, सिद्राई तिप्पाण्णाचे, परशराम हरजी, आप्पानी यड्डी, विनायक चिंगळी, प्रकाश बसरीकट्टी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.