• प्रकाश मरगाळे यांची माहिती

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीनुसार आज महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक मुंबईतील विधान भवनात पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उच्च अधिकार समितीचे सदस्य याचबरोबर मध्यवर्ती महाराष्ट्रकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या या बैठकीकडे बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान आज झालेल्या उच्च अधिकार समितीच्या बैठकी संदर्भात माहिती देताना मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले, आजच्या बैठकीत सीमा प्रश्ना संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ताकतीने बाजू मांडण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर नव्या तीन वरिष्ठ वकिलांची नेमणूक घेण्याबाबत एकमत दर्शविले. सीमा प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्रातील खासदारांना संसदेत सीमाप्रश्नी मराठी भाषिकांचा आवाज उठवण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली. सीमा प्रश्नाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार त्याचबरोबर घटनात्मक हक्कांची पायमल्ली यासंदर्भात विधी तज्ञांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे,आजच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे मरगाळे यांनी सांगितले.