बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सात जणांसह बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुळभावी–मोदगा रस्त्यावर खुल्या जागेत मद्यप्राशन करताना आढळून आलेल्या दुंडय्या हिरेमठ आणि रेवस्त्था पाटील यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने जुन्या भाजी मार्केट परिसरात कारवाई करून राहुल जाधव आणि आकाश लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

काकती पोलिसांनी अलतगा खडी मशीन परिसरात दोन स्वतंत्र कारवाया करत अबुबकर शाहपूरकर, समीर शेख आणि बसवंत दोंडे यांना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना रंगेहात पकडले.

हिरेबागेवाडी पोलिसांनी बस्तवाड गावाजवळ लोकांना मद्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या परशुराम हणमतांचे याला अटक केली. तसेच हुलगवी गावात बेकायदेशीररीत्या दारू साठवून ठेवणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या यशस्वी कारवाया करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.