- २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी ; विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप
बेळगाव : विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या वेळीच ओळखून त्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मार्कंडेयनगर येथील सरकारी शाळेत ॲनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हॅपी हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात एकूण २४६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान रक्तक्षयाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य सुधारण्यासाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. त्यामुळे रक्तक्षयासोबतच विद्यार्थ्यांच्या इतर आरोग्यविषयक समस्यांचीही माहिती घेण्यात आली.
मुलांमधील आरोग्याच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास योग्य उपचार करून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याच उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल हॅपी हार्ट फाउंडेशन आणि केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे रोटरी क्लबतर्फे आभार मानण्यात आले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सक्रिय सहभाग आणि विशेष योगदान दिल्याबद्दल रोटेरियन रक्षाताई उपाध्ये यांचे कौतुक करण्यात आले.







