- बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाचा धार्मिक व अभ्यासपूर्ण सातारा दौरा
- छत्रपती उदयनराजे महाराजांची सदिच्छा भेट, पाडळी गावात पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत व सत्कार
बेळगाव : श्री ज्योतिर्लिंग मंदिर, देवदादा मठ, शिवबसवनगर, बेळगाव येथील शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य निर्विघ्नपणे व धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण व्हावे, या मंगल संकल्पाने श्री देव दादा सासनकाठी, चव्हाट गल्ली, बेळगाव व बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या वतीने सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा डोंगरावर विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री ज्योतिबा देव व काळभैरव देवांना विधिवत अभिषेक घालून पूजा-अर्चा करण्यात आली. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे हाती घेतलेले कार्य यशस्वी व्हावे, कार्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि देवतांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत, या श्रद्धेने देवाच्या चरणी राखणीचा नारळ ठेवण्यात आला.
सासनकाठीचे पुजारी श्री लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडले. यावेळी ज्योतिबा डोंगरावरील गुरव मंडळीही उपस्थित होती. श्री ज्योतिबा व काळभैरव देवांच्या आशीर्वादाने हाती घेतलेले मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य सिद्धीस जावे, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी सर्व सासनकाठी सेवेकरी, भक्त मंडळाचे पदाधिकारी व उपस्थित भाविकांनी केली.
या धार्मिक कार्यक्रमाला मंडळाचे कार्याध्यक्ष नागेंद्र नाईक, खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर, सचिव नामदेव नाईक, उपखजिनदार परेशराम किल्लेकर, उपसचिव ज्योतिबा धामणेकर, श्रीनाथ पवार, नागेंद्र नाईक, ज्योतिबा उर्फ सोनू किल्लेकर, गिरीश उर्फ भाऊ पाटील, सुमित तारीहाळ, विश्वजीत हसबे, सुरेश तारीहाळ, मंथन कामुले, प्रशांत कुढे, मनोज काकतकर यांच्यासह सासनकाठी सेवेकरी व भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
- मंदिर जीर्णोद्धारासाठी अभ्यासपूर्ण पाहणी दौऱ्याची सुरुवात :
श्री ज्योतिर्लिंग मंदिर, देवदादा मठ, शिवबसवनगर येथील प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केवळ बांधकामापुरता मर्यादित न ठेवता मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व जपत पारंपरिक पद्धतीने करण्यात यावा, असा मंडळाचा मानस आहे. याच उद्देशाने जीर्णोद्धाराच्या कामाची सुरुवात श्री ज्योतिबा देवांच्या अभिषेकाने करण्यात आली.
यानंतर मंदिराच्या बांधकामासंदर्भात सखोल माहिती संकलित करण्यासाठी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध प्राचीन मंदिरांना भेटी देण्याच्या अभ्यासपूर्ण उपक्रमालाही सुरुवात करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील ऐतिहासिक व प्राचीन मंदिरांची रचना, वास्तुशैली, मंदिर बांधकामातील पारंपरिक पद्धती, वापरण्यात आलेले साहित्य, दगडी बांधकाम, मंदिर उभारणारे पारंपरिक कारागीर व शिल्पकार यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अवलंबण्यात आलेल्या धार्मिक व पारंपरिक पद्धतींचाही अभ्यास केला जात आहे.
- छत्रपती उदयनराजे महाराजांची सदिच्छा भेट ; बेळगावच्या ऐतिहासिक देवस्थानाची माहिती सादर :
सातारा दौऱ्यादरम्यान बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी व ज्योतिर्लिंग देवस्थानच्या प्रतिनिधींनी छत्रपती माननीय श्री उदयनराजे महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराजांना देवस्थानच्या वतीने देवाचे उपरणे (शाल) व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक आशीर्वाद घेण्यात आले.
या भेटीदरम्यान बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठीचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास, धार्मिक परंपरा, सासनकाठीचे महत्त्व तसेच श्री ज्योतिर्लिंग देवस्थानविषयी सविस्तर माहिती महाराजांना देण्यात आली. बेळगावमधील या प्राचीन देवस्थानच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची माहिती ऐकून महाराजांनी आपुलकीने संवाद साधला.
यावेळी बेळगावच्या देवस्थान मंडळींनी महाराजांनी बेळगावला भेट देऊन देवस्थानचे दर्शन घ्यावे, अशी आग्रहपूर्वक विनंती केली. त्यावर महाराजांनीही लवकरात लवकर बेळगावला भेट देण्याचे आश्वासन दिले. या सदिच्छा भेटीदरम्यान ओंकारराजे भोसले व करणसिंग हंबीरराव मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले.
या भेटीमुळे बेळगावच्या ऐतिहासिक देवस्थानची परंपरा आणि सातारा येथील राजघराण्याशी असलेला सांस्कृतिक व धार्मिक संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली.
- पाडळी गावात बेळगावच्या सासनकाठी मंडळाचे तुतारीच्या निनादात जल्लोषात स्वागत :
बेळगाव ज्योतिर्लिंग देवस्थानच्या मंडळींच्या सातारा दौऱ्याची माहिती मिळताच पाडळी गावचे श्री. विशाल ढाणे यांनी बेळगावच्या दौऱ्यातील मंडळींशी संपर्क साधून पाडळी गावाला भेट देण्याचे सस्नेह आमंत्रण दिले. हे आमंत्रण स्वीकारून नियोजित दौऱ्यात आवश्यक बदल करत बेळगावच्या देवस्थान मंडळींनी पाडळी गावाला भेट दिली.
यावेळी श्री ज्योतिर्लिंग ट्रस्ट, पाडळी, जिल्हा सातारा यांच्या वतीने बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्री ज्योतिबा डोंगरावरील यात्रेदरम्यान क्रमांक एकची मानाची सासनकाठी म्हणून ओळख असलेल्या आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पाडळीच्या सासनकाठीच्या वतीने बेळगावच्या मंडळींचे तुतारीच्या निनादात व मोठ्या थाटामाटात गावात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पाडळी गावातील विविध देवस्थानांना भेटी देण्याची व्यवस्था करण्यात आली. या भेटीदरम्यान तेथील देवस्थानांचा इतिहास, धार्मिक परंपरा, सासनकाठीचे महत्त्व, यात्रा उत्सव, देवस्थानची कार्यपद्धती आणि ऐतिहासिक वारसा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
दोन्ही देवस्थानांच्या प्रतिनिधींमध्ये अतिशय आपुलकीचा आणि उत्स्फूर्त संवाद झाला. बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठीची परंपरा आणि पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचा इतिहास यांची परस्पर माहिती जाणून घेत धार्मिक परंपरा, देवस्थानचे व्यवस्थापन आणि भविष्यातील सहकार्य याबाबतही चर्चा करण्यात आली.
या भेटीचा समारोप पाडळी गावातील ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाच्या सर्व प्रतिनिधींना पारंपरिक भगवा फेटा बांधून व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पाडळी ग्रामस्थांनी दाखविलेल्या आदरातिथ्यामुळे बेळगावच्या मंडळींनी समाधान व्यक्त केले.
- ऐतिहासिक परंपरा जपत मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प :
या अभ्यासपूर्ण दौऱ्याचा मुख्य उद्देश शिवबसवनगर येथील शेकडो वर्षांच्या प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे मूळ स्वरूप, ऐतिहासिक वास्तूवैभव, धार्मिक महत्त्व आणि पारंपरिक स्थापत्यशैली जतन करणे हा आहे.
कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील प्राचीन मंदिरांची पाहणी, तेथील अनुभवी कारागीर व शिल्पकारांची माहिती, पारंपरिक बांधकाम पद्धती आणि मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्यातील अनुभव यांचा अभ्यास करून त्याचा उपयोग बेळगाव येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात येणार आहे.
शिवाय या दौऱ्यात झालेल्या विविध देवस्थानांच्या भेटी, छत्रपती उदयनराजे महाराजांचे मार्गदर्शनपर आशीर्वाद आणि पाडळी ग्रामस्थांनी केलेले जिव्हाळ्याचे स्वागत यामुळे या उपक्रमाला धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रद्धा, परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि अभ्यासपूर्ण नियोजन यांचा सुंदर संगम साधत हाती घेतलेले प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य श्री ज्योतिबा व काळभैरव देवांच्या आशीर्वादाने यशस्वी व्हावे, तसेच विविध देवस्थानांमधील धार्मिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत, हीच भावना यावेळी सर्व भक्तांनी व्यक्त केली.








