- एमएफसी मुंबई एफसी संघाला उपविजेतेपद
- उपांत्य फेरीत जीएफडीसीचा २-० ने पराभव
बेळगाव : गोवा येथे झालेल्या १२ वर्षांखालील एलिट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जैन हेरिटेज स्कूल, बेळगावच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या शाळेचा नावलौकिक वाढविला. एमएफसी मुंबई एफसी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात पराभव झाल्याने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शाळेचे पीटर एस. आंद्राडे (इयत्ता पाचवी), वंश वाय. पडवळकर (इयत्ता सहावी), समर्थ के. राणे (इयत्ता सातवी) आणि विवान एस. फाग्रे (इयत्ता सातवी) यांनी एमएफसी मुंबई एफसी संघाकडून या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेपूर्वी संघातील खेळाडूंना सरावासाठी आणि परस्परांशी समन्वय साधण्यासाठी कमी वेळ मिळाला होता. मात्र, नव्या संघासोबत जुळवून घेत या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि सांघिक भावनेच्या जोरावर प्रभावी खेळ केला.
उपांत्य फेरीत एमएफसी मुंबई एफसी संघाने जीएफडीसी संघाचा २-० गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात समर्थ राणे याने लांबून अचूक फटका मारत गोल नोंदविला, तर वंश पडवळकर याने शानदार फ्री-किकवर गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
अंतिम फेरीत एमएफसी मुंबई एफसी संघाची गाठ चेन्नई फुटबॉल क्लबशी पडली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नई संघाने २-० गोलफरकाने विजय मिळविला. त्यामुळे एमएफसी मुंबई एफसीला उपविजेतेपद मिळाले. विजेतेपद हुकले असले तरी अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्याची संघाची कामगिरी कौतुकास्पद ठरली.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर खेळण्याचा अनुभव मिळाला. तसेच दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत आपले फुटबॉल कौशल्य विकसित करण्याची संधीही मिळाली. या यशाबद्दल पीटर आंद्राडे, वंश पडवळकर, समर्थ राणे आणि विवान फाग्रे यांचे जैन हेरिटेज स्कूलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. एमएफसी मुंबई एफसी संघातील सर्व खेळाडूंचेही कौतुक करण्यात आले.
शाळेचे प्रशिक्षक रितेश कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला असून, सर्व खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








