• बलभीम मराठी साहित्य संघाच्या बैठकीत निर्णय
  • संमेलनाच्या तयारीला लवकरच सुरुवात

बेळगाव : कुद्रेमानी येथील बलभीम मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे २१ वे मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. मराठी साहित्याची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

बलभीम मराठी साहित्य संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी रात्री संघाच्या कार्यालयात पार पडली. संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीत संमेलनाध्यक्षांची निवड, विविध साहित्यिक सत्रांचे नियोजन, तसेच व्याख्याते, कथाकार, कवी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाली. साहित्यरसिकांसाठी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संमेलनाचे नियोजन करण्यावर उपस्थितांनी भर दिला.

यावेळी नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, शिवाजी मुरकुटे, शांताराम गुरव, दत्ता कांबळे, महादेव गुरव, परशराम पाटील, अजित सुतार, प्रशांत सुतार, अनंत लोहार, शैलेश गुरव, उमेश गुरव, विशाल गुरव, मारुती पाटील, दीपक मराठे, विशाल हुलजी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्यविषयक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या बलभीम मराठी साहित्य संघाच्या वतीने यंदाचे २१ वे संमेलनही भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्यासह मराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या तयारीला लवकरच सुरुवात होणार असून, कुद्रेमानी परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये या संमेलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.