- नवरात्रोत्सवानिमित्त विशेष आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन
बेळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे जुन्या पी. बी. रोडवरील रेणुका देवी मंदिरात विशेष आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किन्नर समाजातील नऊ मंगलमुखींना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
हिंदू परंपरेत मंगलमुखींना शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. आदिशक्तीच्या उपासनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या नवरात्रीच्या पवित्र काळात त्यांचे आशीर्वाद लाभणे शुभ मानले जाते. याच भावनेतून फाउंडेशनने या विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नऊ मंगलमुखींनी सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. या सोहळ्यामुळे उपस्थितांना भावनिक आणि आध्यात्मिक अनुभूती मिळाली.
पाही वाईब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू. यांनी या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना आदिशक्तीचे ज्ञान आणि कृपा लाभो. मंगलमुखींचे आशीर्वाद मिळणे ही फाउंडेशनसाठी आनंदाची आणि सौभाग्याची बाब आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे रवींद्र सुतार यांचे आभार मानण्यात आले.








