बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध कवी अजय कांडर आणि कवी, पत्रकार विजय चोरमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेमध्ये कविता म्हणजे काय?, कवितेचे स्वरूप, कवितेचे विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता कशी लिहावी, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- अजय कांडर परिचय :
समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून अजय कांडर यांची ओळख आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध साहित्य संमेलनांत त्यांनी मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
- विजय चोरमारे परिचय :
प्रसिद्ध पत्रकार, कवी आणि लेखक विजय चोरमारे यांनी १९८७ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. दैनिक सकाळ, लोकमत, प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले आहेत. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
कविता लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, साहित्य अभ्यासक, विद्यार्थी तसेच रसिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








