बेळगाव : अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली. जिल्हा अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

बेळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस ठाण्यांमध्ये अवैध विक्री, वाहतूक आणि अंमली पदार्थांच्या लागवडीशी संबंधित नोंदविण्यात आलेल्या एकूण २३ प्रकरणांमधील जप्त मुद्देमालाचा यामध्ये समावेश होता.

न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक परवानगीनंतर, जिल्हा अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सावदत्ती तालुक्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरुगोप्पा गावाजवळ असलेल्या द बेळगाव ग्रीन एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पात ही विल्हेवाट प्रक्रिया पार पडली.

या कारवाईत सुमारे १० लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचे आणि २२ किलो ५०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ नियमांनुसार वैज्ञानिक पद्धतीने पूर्णतः नष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, अशा गुन्ह्यांविरोधात पोलिसांचे विशेष अभियान पुढेही कायम राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.