- सरचिटणीसांचा राजीनामा
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सर्व आठही आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित पहिला एफआयआर (गुन्हा) दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आली.
यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू याचाही यात समावेश आहे.सध्या सर्व आठही आरोपींची चौकशी केली जात असून अटक मेमो आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली.
दानपेटीतून 7 ते 7.5 कोटींची चोरी झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने सर्वप्रथम केला होता. त्यानंतर विरोधी पक्षातील इतरही नेत्यांनी आरोप केले. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या भाजपच्या काळातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. देणगी घोटाळ्याप्रकरणी रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष, करुणेश आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








