बेळगाव : समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे खजिनदार विनायक कावळे यांच्याहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही पुष्प अर्पण करत अभिवादन केले.
यानंतर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. शाहू महाराजांनी शिक्षण, कृषी, अस्पृश्यता निवारण आणि रंजल्या-गांजल्यांच्या कल्याणासाठी दिलेले अभूतपूर्व योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. “शाहू महाराजांचे पुरोगामी विचार आणि त्यांनी लावलेले समतेचे रोपटे आजच्या काळातही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे,” असे मत श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, आनंद पाटील, श्रेयांश कृष्णाचे उपस्थित होते.








