- ६ सप्टेंबरला कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गावाचे तसेच आपल्या शाळांचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नऊ युवा खेळाडूंचा राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे रविवारी, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता सन्मान करण्यात येणार आहे.
बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धा-२०२६ मध्ये बिजगर्णी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सानिका सु. बाचीकर हिने १७ वर्षांखालील ४०० मीटर रिले प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. पै. स्वस्तिक मोरे याने १०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
बेळगुंदी प्राथमिक विभागातील स्पर्धांमध्ये कावळेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली. गणेश य. मोरे याने २०० मीटर धावण्यात प्रथम, तर ४०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळविला. श्रेयस दिलीप यळ्ळूरकर याने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
किणये विभागीय स्पर्धेत कर्ले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. श्रेया य. मोरे आणि प्रितिका मा. मोरे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच सांघिक कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावण्यात विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या कामगिरीत दर्शना य. जाधव, तनुजा जो. यळ्ळूरकर आणि प्रियांका प. मोरे यांचाही सहभाग आहे.
या नऊ खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या यशाचा गावकऱ्यांना अभिमान असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आगामी तालुकास्तरीय स्पर्धांमध्येही यश मिळवावे आणि त्यानंतर जिल्हा व राज्यस्तरावर आपल्या गावाचे तसेच शाळेचे नाव उंचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गावातील राष्ट्रीय धावपटू प्रेम बुरुड तसेच पै. रवळनाथ कणबरकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीतील खेळाडूंनी पुढे वाटचाल करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.








