- पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
बेळगाव : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शहरासमोरील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी राकसकोप जलाशयाची पाहणी करत उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला.
बेळगाव शहराला मुख्यतः राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या तापमानात होत असलेली वाढ आणि वाढता पाण्याचा वापर यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जलाशयातील विद्यमान पाणीसाठा, मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागणारी संभाव्य पाण्याची गरज तसेच हिडकल जलाशयातून मिळणाऱ्या पूरक पाणीपुरवठ्याची माहिती घेतली.
सध्याचा पाणीसाठा योग्य नियोजन केल्यास काही काळासाठी पुरेसा ठरू शकतो, मात्र पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनीही पाणी बचतीबाबत सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.








