बेळगाव : विरोधकांना निवडणुका जिंकता येत नसल्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मतदार चोरीचे खोटे आरोप करत असून हा प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे, अशी टीका खासदार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली. तसेच सत्ता मिळाल्यामुळे डी. के. शिवकुमार बेभान झाल्याचा घणाघात त्यांनी केला पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर यांनी मतदार यादी पुनरीक्षणावरून होणाऱ्या राजकारणाचा तीव्र धिक्कार केला. पराभवाच्या छायेत असलेल्या काँग्रेसकडून पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा कट रचला जात आहे. मृत आणि बनावट नावे वगळण्याच्या नियमित प्रक्रियेला राहुल गांधी मतदार चोरी म्हणत असून, ही त्यांची निव्वळ राजकीय अपरिपक्वता आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारावर टीका केली. हमी योजनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असून विकासकामे पूर्णपणे थांबली आहेत. कंत्राटदारांची हजारो कोटींची थकबाकी भागवायला सरकारकडे पैसा उरलेला नाही. वीरशैव मठाधीशांविषयी बेताल वक्तव्ये करणे हे मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचे प्रदर्शन असून त्यांनी मठाधीशांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यातच अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी विधानसौधमध्ये उर्दू उत्सव साजरा करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील आणि महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.








