- बिदर-भालकीसह संपूर्ण सीमाभागातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा
- जनआंदोलन उभारण्याचा निर्धार
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा व्यापक स्वरूपात वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे पार पडली. या बैठकीत बिदर-भालकीसह बेळगाव, खानापूर, कारवार आणि निपाणी परिसरातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर-भालकीचे अध्यक्ष दिनेश मुधाळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी बिदर आणि भालकी तालुक्यातील मराठी भाषिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मराठी शाळांबाबत निर्माण होत असलेल्या अडचणी, मराठी भाषिकांशी होणारा कथित अन्याय तसेच कर्नाटक सरकारच्या भूमिकेबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी बेळगाव, खानापूर, कारवार आणि निपाणी परिसरातील बदलत्या परिस्थितीवरही चर्चा झाली. सीमाभागातील लोकसंख्येतील बदल, मराठी भाषेतील फलकांना होणारा विरोध आणि मराठी भाषिक तरुणांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा आढावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात महाराष्ट्रातील नेते आणि समन्वयक मंत्र्यांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या पाठपुराव्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर सीमाप्रश्नाबाबत कितपत प्रयत्न झाले, यावरही चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर सीमाप्रश्नासाठी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काही महिन्यांत केवळ बेळगावपुरते आंदोलन मर्यादित न ठेवता बिदर-भालकी, कारवारसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्रित करून पुणे आणि मुंबई येथे मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
या आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधण्याचा तसेच केंद्र सरकारवर या प्रश्नाच्या तोडग्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दिनेश मुधाळे यांनी यावेळी भूमिका मांडताना केवळ निवेदने देऊन सीमाप्रश्न सुटणार नसून, आता व्यापक जनआंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीचे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे सांगितले.
बैठकीला पुणे विभागातील पदाधिकारी विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, सातेरी पाटील, वैराळ सुळकर, मारुती पाटील, गंगाराम वीर, अर्जुन वीर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








