- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
नवी दिल्ली : देशात महागाईचा दबाव वाढत असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. सीएनजी, सोने-चांदी, दूध आणि गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरांनंतर इंधन दरवाढीची भर पडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत असून, शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये १४ पैशांची तर डिझेलच्या दरात ३ रुपये ११ पैशांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने मौल्यवान धातूंचे दरही चढले आहेत. घरगुती वापरातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा फटका अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन ही इंधन दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत. तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्री पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे नव्या दरांची माहिती दिली होती.








