तामिळनाडू : राज्याच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. टीव्हीके पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर जोसेफ विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत मोठे यश मिळवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभाला लाखो समर्थक आणि चाहत्यांची उपस्थिती लाभली.

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ए. आर. व्ही. अर्लेकर यांनी विजय यांच्यासह नऊ सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मागील सरकारच्या परंपरेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत मुख्यमंत्री विजय आणि मंत्र्यांनी देवाच्या नावाने शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विजय यांनी जनतेला संबोधित करताना, “मी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेलो नाही, मात्र जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करणार नाही,” असे सांगितले.

यावेळी त्यांनी मागील डीएमके सरकारवर टीका करत राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा केली. तसेच अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबवणे, पारदर्शक प्रशासन देणे आणि सामाजिक न्यायावर आधारित शासन व्यवस्था उभी करणे हे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.