• शहापूर पोलिसांकडून ४५ लाखांहून अधिक किमतीचे सोनं जप्त

बेळगाव : शहरातील शहापूर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ४५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०२६ नोंद करण्यात आला होता. भारतनगर, शहापूर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार बीएनएस २०२३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी मिंटू विश्वास उर्फ चिंटू (वय ५२, रा. तिलक नगर, पश्चिम दिल्ली) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २९४.१९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या दागिन्यांची अंदाजे किंमत ४४ लाख ८६ हजार ३९० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून तिची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४५ लाख ५६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, प्रवीण बिरादार, मंजुनाथ भजन्त्री (सीसीबी) यांच्यासह विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तांत्रिक व फिंगरप्रिंट विभागानेही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.