बेळगाव : कर्तव्यनिष्ठा आणि फिटनेसची आवड यासाठी ओळखले जाणारे आयजीपी संदीप पाटील यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेली अत्यंत आव्हानात्मक ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करत आणखी एक मानाचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. ही त्यांची सहावी ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धा ठरली असून त्यांच्या या यशामुळे कर्नाटक पोलीस दलाचा गौरव वाढला आहे.
गोवा, थायलंड, पोलंड, तुर्की आणि कोपनहेगननंतर आता सिडनीमध्येही त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची छाप उमटवली. पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा अत्यंत कठीण टप्प्यांचा समावेश असलेली ही जगप्रसिद्ध स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आयजीपी संदीप पाटील यांची ही कामगिरी केवळ शारीरिक क्षमतेचे उदाहरण नसून, कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे तरुणाईसह पोलीस दलातही नवचैतन्य निर्माण झाले आहे.








