• डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन 
  • वा. च. मंडळाचा साहित्य पुरस्कार सोहळा

बेळगाव : मराठी ही भारतातीलच नव्हे तर जगातली एक प्रमुख भाषा आहे. आज जगात मराठी बोलणारे १५ कोटी लोक आहेत. ही संख्या जपानच्या लोकसंख्ये एवढी आहे. ज्या भाषेला ९४ बोली भाषा आहेत, ज्या भाषेत दरवर्षी २५० साहित्य संमेलने होतात, ज्या भाषेत दरवर्षी ३००० हून अधिक पुस्तके प्रकाशित होतात त्या भाषेने आणि भाषिकांनी न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यानी केले. ‘कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीचे महत्व आणि भविष्यवेध’ या विषयावर ते आपले विचार मांडत होते- वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष विजय देशपांडे, प्रमुख नीता कुलकर्णी, जगदीश कुंटे व स्वाती कुलकर्णी या होत्या.

डॉ. सागर देशपांडे पुढे म्हणाले,” नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळली याला आपणच जबाबदार आहोत. पण अजून वेळ गेलेली नाही. मुलांशी आपण आपल्या भाषेतून संवाद साधायला हवा. आपण आपल्या मुलांना, नातवंडाना मराठी शिकवलं पाहीजे. जमतील तेवढे व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. इंग्रजीला आमचा विरोध नाही. पण इंग्रजीतून शिक्षणाला विरोध आहे. “

कृत्रिम प्रज्ञा म्हणजे एआयच्या युगात मराठीला अधिक संधी उपलब्ध आहे. एआय मुळे माहितीचे संकलन सोपे होत आहे. कवितांचा अन्वयार्थ लावणे सुलभ होणार आहे. जे सच्चे आहे त्याला एआय जमान्यात मरण नाही, उलट त्याला जास्त मान मिळेल. आपल्या कवितांचे, लावण्यांचे, ओव्यांचे आणि म्हणीचे वैभव आपण नव्या पिढीपर्यंत सहज पोचवू शकू.

सर्व तऱ्हेच्या गाण्यांचे, साहित्याचे पॅटर्न आता एआयमुळे मिळू शकतील. आपल्या भाषेचं, आपल्या गावाचं, आपल्या संस्कृतीचं महत्व शाळा कॉलेजीसनी त्याच प्रमाणे ग्रंथालय आदि संस्थांनी जपलं पाहिजे. जिथं जिथं मराठी भाषिक लोक आहेत तिथं तिथं मराठीचे पुनरुज्जीवन होत आहे. गेल्या एकाच वर्षात अमेरिकेत ५० नवे मराठी वर्ग सुरु झाले- ज्ञान ही अमेरीकेची ताकद आहे. ही ताकद आपण जेव्हा ओळखू तो सुदिन असे ते पुढे म्हणाले.

त्यानंतर वर्ष २०२४ व २०२५ या दोन वर्षांकरीता साहित्य पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. सर्वश्री संतोष आळंजकर, अनंता सूर, विजय माळी, नवनाथ गोरे, डॉ. माधव पुराणिक आणि नंदन हेर्लेकर थाना २०२४ चे तर २०२५ साठी संगीता अरबुने, कल्लाप्पा पाटील, बाळासाहेब नागरगोजे, संजय आंग्रे, प्रा. सुहास बोबडे आणि उदय लवाटे याना पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी संगीता अरबुने यांनी वा. च. मंडळाला देणगी दिली.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथे नुकताच ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या बेळगावच्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचा वाङ्‌मय चर्चा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.

वरेरकर नाटय संघाच्या सभागृहात रविवार दि. १० मे रोजी पार पडलेल्या या समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल पाटणेकर यांनी केले. जगदीश कुंटे यानी डॉ. सागर देशपांडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाटणेकर यांच्याहस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचा परिचय स्वाती कुलकर्णी आणि नीता कुलकर्णी यांनी करून दिला. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या वतीने डॉ. माधव पुराणिक यानी मनोगत व्यक्त केले. माधव कुंटे यानी सूत्रसंचालन करून आभार मानले.