- शहर व ग्रामीण भागातील कारवाईत सहा जण ताब्यात
बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मटका आणि जुगार खेळणाऱ्या सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड आणि जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.
१३ मे २०२६ रोजी टिळकवाडी, कॅम्प आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. टिळकवाडी पोलिसांनी भाग्यनगर परिसरात छापा टाकून मटका स्वीकारत असलेल्या आनंद बसप्पा होन्नळ्ळी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जमा झालेली रक्कम संगीता बाळू कमकारट्टी हिच्याकडे देत असल्याचे सांगितल्याने दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवी यांच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर गावानजीक कारवाई करत ओसी जुगार खेळणाऱ्या सागर पांडुरंग कुंडेकर याला ताब्यात घेण्यात आले.
तसेच कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोबी घाट परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी अष्टू लक्ष्मण लामाणी, ॲलेक्स इडदो फ्रान्सिस, सुदीप लक्ष्मण लामाणी आणि महेश गोपाळ पाटील यांना ताब्यात घेण्यात आले.
या सलग कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.








