• सीसीबी पोलिसांची कारवाई

बेळगाव : शहर सीसीबी पथकाने काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद निसार सय्यद इसाक (वय ४०, रा. आझाद नगर, परळी, जि. बीड, महाराष्ट्र) हा एनएच-४८ सेवा मार्गावरील चिगरी प्रकृती शिबिराजवळ गांजा विक्रीसाठी आला होता. याची माहिती मिळताच सीसीबीचे पीआय मंजुनाथ नायक, पीएसआय मंजुनाथ भजन्त्री आणि त्यांच्या पथकाने तातडीने धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

या कारवाईत आरोपीकडून ६ किलो १४५ ग्रॅम गांजा, अंदाजे ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच 5 हजार रुपयांचा विवो मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीबी पथकाच्या या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.