निपाणी / प्रतिनिधी

निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे अल्पशा आजाराने रात्री दोन वाजता बेळगाव येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ते बेळगाव येथील रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आज पहाटे त्यांचे निधन झाले. 68 वर्षीय काकासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने निपाणी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

१९७५ मध्ये देवचंद कॉलेजमधून बीएची पदवी पूर्ण केल्यानंतर ते एक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते होते. मराठा समाजाचे असल्याने त्यांनी त्यांच्या समाजाची मते काँग्रेस पक्षाकडे यावीत यासाठी कठोर परिश्रम केले होते.

१९९९, २००४ आणि २००८ मध्ये ते निपाणी मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तीन वेळा विजयी झाले होते. परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता मुन्सिपल हायस्कूल येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर निपाणी शहरातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.