- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडूनच थर्मल प्रिंटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी बेळगाव जिल्हा सरकारी रेशन वितरक कल्याण संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले आहे.
विभागाचे अधिकारी रेशन दुकानदारांवर थर्मल प्रिंटर बसवण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, स्टेशनरीचा खर्च आणि वाढीव वीज बिल यामुळे दुकानदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. अशा स्थितीत थर्मल प्रिंटर खरेदी करणे त्यांना शक्य नाही. यामुळे, सरकारने या अडचणीची दखल घेऊन विभागानेच हे थर्मल प्रिंटर खरेदी करून दुकानदारांना पुरवावेत, अशी मागणीही संघटनेने या निवेदनातून केली आहे.
तसेच, प्रिंटरसाठी आवश्यक असलेले पेपर्स आणि काडतुसे देखील विभागानेच नियमितपणे उपलब्ध करून द्यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. रेशन दुकानदारांच्या या मागणीमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी आणि सरकारी आदेशांमुळे त्यांच्यावर येणारा ताण पुन्हा एकदा समोर आला आहे. सरकारने या मागणीकडे लक्ष देऊन रेशन दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे निवेदन सादर करताना बेळगाव जिल्हा सरकारी रेशन वितरक कल्याण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.